पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यात घडली घटना,
वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला
दि.२४ विदर्भ प्रजासत्ताक
भंडारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची खोल वैनगंगा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण वेळीच मदत मिळाल्याने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या दोऱ्यावर होते. या दौऱ्यात ते वैनगंगा नदीवर होणाऱ्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्याचे टप्प्याचे भूमिपूजन करणार होते. यासाठी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी आलेले पत्रकार 2 स्वतंत्र बोटीतून नदीपात्रात जाऊन आढावा घेत होते. यावेळी पत्रकार मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी बोटीच्या एका बाजूला आले आणि काही कळण्याच्या आतच त्यांची बोट नदीपात्रात कलंडली. या अनपेक्षित घटनेमुळे सर्वचजण घाबरले.
पण यावेळी तिथे असणाऱ्या इतर बोटी तत्काळ बचावकार्यासाठी आल्यामुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हा प्रकार पाहून आपल्या बोटीसह मदतकार्यासाठी पोहोचले. या घटनेत काही कॅमेरामन्सचे कॅमेरे पाण्याच्या संपर्कात आले. त्यात त्यांचे जबर नुकसान झाले. हे वगळता इतर दुसरी कोणतीही हानी झाली नाही. आमच्या प्रतिनिधीने पत्रकारांना घेऊन जाणारी बोट खडकावर आदल्यामुळे तिचे 3 तुकडे झाल्याची माहिती दिली आहे.
दुसरीकडे, पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार एका बाजूला आल्यामुळे बोट बुडाली नाही तर ती केवळ कलंडल्याचा दावा केला आहे. फोटोग्राफर व कॅमेरामन्स मुख्यमंत्र्यांचे फोटो काढण्यासाठी बोटीच्या एकाबाजूला आले. यामुळे बोट अस्थिर होऊन एका बाजूला कलंडली. पण त्यानंतर ती स्थिर झाली, असे त्यांनी म्हटले आहे.