नागपुरात ऑरेंज अलर्ट, आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२०नागपूर
हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज शनिवारी (दि. २० जुलै) मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २० जुलै रोजी बंद राहतील. हवामान विभागाने नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे.
हवामान विभागाने नागपूरला २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोनसोबत बाळगू नका. याचबरोबर घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. याशिवाय जल पर्यटन स्थळी उत्साहात, जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नका. आपण कितीही चांगले जलतरणपटू असलो तरीदेखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत असताना पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असताना चुकूनही तो पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडीमधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.