
विदाऊट ऑक्सिजन स्केटिंग करत पोलीस जलतरण केंद्रात तिरंग्याला दिला सन्मान;
पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
अमरावती
अमरावती शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रवीण सावित्री दादाराव आखरे यांनी पाण्याखाली, श्वसन यंत्रणा (ऑक्सिजन सिलिंडर) न वापरता, स्केटिंग करत तिरंगा फडकावण्याचा ऐतिहासिक प्रयोग यशस्वी केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार प्रवीण सावित्री दादाराव आखरे यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व जगात पहिल्यांदाच अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोलीस आयुक्त श्री. अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, अमरावती पोलीस जलतरण केंद्र येथे पाण्याखाली विदाऊट ऑक्सिजन स्केटिंग करत तिरंगा फडकावण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रयोग करताना कोणतीही श्वसन सहाय्यक साधने वापरण्यात आली नाहीत.

या उपक्रमात पाण्याखाली स्केटिंग करत असताना तिरंगा हातात घेऊन त्याचे लहरवणे हे कौशल्यपूर्ण व धाडसी काम होते. हवालदार आखरे यांच्या या प्रयत्नाला उपस्थित मान्यवर व सहकाऱ्यांनी दाद दिली.पोलीस आयुक्तालय अमरावती शहराने सांगितले की, “हा महाराष्ट्रात, भारतात व जगातही पहिला प्रयोग असून, पोलिस दलाच्या शारीरिक क्षमतेचे व देशभक्तीचे अप्रतिम उदाहरण आहे.”
या अनोख्या उपक्रमामुळे अमरावती शहर पोलीस दलाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
