♦जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लबचे उद्घाटन
♦जनहित कल्याण संघटनेचा पुढाकार
◊लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडुंना हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी जनहित कल्याण संघटनेच्या पुढाकारातून मारेगांव येथे जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लब ची स्थापना करुन ता. २७ फेब्रुवारीला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या हस्ते तथा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,नगराध्यक्ष मनिष मस्की,जेष्ठ नेते गजानन पाटील किन्हेकर,ठाणेदार राजेश पुरी तथा आजी माजी सैनिक,नगर सेवक नंदेश्वर आसुटकर तथा सतिश पांडे यांच्या उपस्थितीत जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
मारेगांव तालुका हा अनेक समस्यांनी ग्रस्त असुन शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडुंना त्यांच्यात असणारे कौशल्य दाखविण्यासाठी सराव हा महत्वाचा आहे.परंतु सराव करण्यासाठी तालुका स्थळी क्रीडा संकुल असणे आवश्यक असतांना क्रिडा संकुल नसल्याने खेळाडु सुध्दा यापासून उपेक्षित आहे.
दरम्यान मागील आठ महिन्यापुर्वी गौरीशंकर खुराणा यांनी तालुक्यातील युवकांना सोबत घेवुन सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी “जनहित कल्याण संघटनेची” स्थापणा करुन सततचा ओला कोरडा दुष्काळ,त्यामुळे आर्थिक विवंचणेतुन होणाऱ्या आत्महत्या, या विषयाला हात घालत अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना “खारीचा वाटा” उचलत मदत,घसरलेल्या आरोग्य सेवा,यासाठी रुग्ण वाहीका देत सर्व सामान्यांच्या खिशाला लागणारी कात्री कमी केली.अनेक रुग्णांना आर्थिक मदत, तथा सांस्कृतिक कार्यक्रम, यासारख्या कार्यक्रमास मदत देवुन त्यातच समाधान शोधुन,सामाजिक कार्याला अग्रक्रम देत जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी आता तालुक्यातील खेळाडुप्रती असलेली ओढ व क्रीडा संकुला अभावी खेळाडुंची होत असलेली ओढातान लक्षात घेउन शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडुंसाठी “जनहित कल्याण स्पोर्टिंग क्लबची” स्थापणा करण्याचा निर्णय घेवून ता. २७ फेब्रुवारी रोजी स्थानिक कृषी बाजार समितीमध्ये “जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लब” चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विविध खेळांचे खेळाडूंकडून प्रात्यक्षिक सुध्दा करुन दाखविण्यात आले.
या प्रसंगी मंचावरील पाहुण्यांनी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन केले. यावेळी जनहित कल्याण संघटना तालुका अध्यक्ष समीर कुडमेथे, उपाध्यक्ष राॅयल सय्यद, सचिव निलेश तेलंग, गौरव आसेकर, धिरज डांगाले, तथा जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लब सदस्य उपस्थित होते.